Friday 29 November 2013

भारतीय नृत्याचे आंतरराष्ट्रीय फ्युजन- अदिती भागवत

पूर्वप्रसिद्धी: चित्रलेखा, प्रियदर्शिनी (२६ ऑगस्ट २०१३)
         माझी सहेली (दिवाळी २०१३)

एका रंगलेल्या संगीत मैफलीत तीन विदेशी वादक सतार, गीटारसारखी वाटणारी पण वेगळी अशी काही वाद्य घेऊन कार्यक्रम सुरु करण्याच्या तयारीत आहेत. इतक्यात रीत्रीची गडद निळाई पांघरल्याप्रमाणे निळाशार गाऊन घालून आम्बोड्यात निळे फुल खोउन एक भारतीय तरुणी मंचावर अवतरते. हि नृत्य सादर करणार आहे का.... नाही... ही तर एक बाजूला जाऊन उभी आहे. मैफल सुरु होते आणि अजूनही हि तरुणी नेमकी काय करणार आहे हे उमगलेलं नसतानाच ती आपला गाऊन वर धरते व वादकांच्या तालावर घुंगरू बांधलेल्या पायाचा एक ठेका घेते आणि त्याबरोबर एक विलक्षण अनुभवाची प्रचीती येते. अरे... ही तर आपली अदिती भागवत आहे.
संगीत क्षेत्रातील वनबीट या आंतरराष्ट्रीय संस्थेचे हे सारे वादक आहेत. अमेरिकेच्या राज्यस्तरीय सांकृतिक विभागाने व न्यूयॉर्कमधील ‘बँग ओन अ कॅन’ या प्रसिद्ध संस्थेचीच असलेली एक उपशाखा ‘फाउड साउंड नेशन’ या संस्थेने मिळून ‘वन बीट’ नावाचा एक फेलोशिप उपक्रम आखला आहे. जगभरातील वेगवेगळ्या माध्यमातून संगीत क्षेत्रात निराळे व अनोखे प्रयोग करणारे व आपले योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी ही फेलोशिप आहे. पण अदिती तर कत्थक नृत्यांगना आहे आणि ती चक्क संगीत विषयातील फेलोशिपसाठी इथे काय करतेय, असा प्रश्न कोणालाही पडेल. अदिती केवळ कथ्थक नृत्यांगना म्हणून ओळखली जात नाही तर ती अभिनयही करते. निवेदन करते, ती ओडिसी नृत्यप्रकार ही शिकली आहे. शिवाय गेले १० ते १२ वर्ष तिने कथ्थकसोबत इतर नृत्यप्रकारातील मेळ साधून काही फ्युजन प्रयोगही केले आहेत. अशाच एक प्रयोगापैकी तीचा एक प्रयोग तिने वनबीट या फेलोशिपसाठी केला आहे. ‘फुट पर्केशनीस्ट’ म्हणून तिने नृत्यांगना असूनही एक संगीतकार म्हणून २०१२ या पहिल्याच वर्षी आंतरराष्ट्रीय फेलोशिप संपादित केली.
फुट पर्केशनीस्ट; पायांच्या आघाताने नादमय संगीत निर्माण करणे. अदितीने आपल्या कथ्थक निपुणतेचा पाया घेऊन कथ्थकमधील पदन्यास किंवा तत्त्कार या शैलीचा वापर करत संगीत तयार केले. “वनबीटसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही साधी सोप्पी नव्हती तर त्यातही अनेक आव्हान होती. याची प्रवेश प्रक्रिया एकूण ४ ते ५ महिन्यांची होती. जानेवारी-फेब्रुवारी २०१२ला सुरु झाली होती. त्यांची एक प्रश्नावली असते त्यात केवळ स्वतःची माहिती देणं अपेक्षित नसतेच तर कलाकार म्हणून कला किंवा त्याची सांगड याबद्दल तुमचा दृष्टीकोन काय आहे हे त्यांना अपेक्षित असते. म्हणजे तुम्ही काय पद्धतीने काम केले आहे, तुमच्या कामातून सामाजिक बांधिलकी जपली आहेत का, आजच्या पिढीचे कलाकार म्हणून तंत्रज्ञानाचा तुमच्या कलेत कसा वापर करता? असे अनेक प्रश्न विचारले जातात. शिवाय तुमचे फोटो, तुमचे विडीओ त्यांना पाठवावे लागतात. यात माझी निवड झाली व जूनमध्ये मला त्यांचा फोन आला. हि प्रक्रिया काही फार सोप्पी नव्हतीच. पण या सगळ्याची मी पूर्वतयारी केली होती. ज्यामुळे माझे काम त्यांना आवडले व एकूण ४० देशांमधून ३२ कलाकार निवडले गेले. त्यांनतर निवडलेल्या एकूण कलाकारांपैकी तुम्हाला कोणत्या कलाकारांबरोबर काम करायला आवडेल हे त्यांनी विचारले होते. त्या सर्वांची यादी त्यांनी पाठवली होती. मग त्या कलाकारांचा कामाचा आढावा मी जवळ-जवळ आठवडाभर घेत होते आणि मग पुन्हा एक अर्ज द्यायचा होता. भारताचे प्रतिनिधित्व मी केले व सप्टेंबर-ओक्टोबर २०१२ ला हि फेलोशिप मला मिळाली.” अदिती अभिमानाने सांगत होती.
अदितीने निवडताना काही तंतुवाद्य वादाकांसोबत काम करायचे ठरवले पण प्रत्यक्ष जेव्हा सर्व कलाकारांची भेट झाली तेव्हा मात्र प्रत्येकासोबत तीला काम करायला मिळाले. क्वॉट्रो (चार तारा असलेली गिटार), इराकमधील एक संतूर, कोरिओमधील गयागुम, अमेरिकेतील बेन्जो, टांझियामधील घुमरी हे वाद्य, असे अनेक देशातील वेगवेगळी तंतुवाद्य होती. त्यांच्यासोबत अदितीने पदन्यास व तत्त्कार यांची साथ घेऊन काम केले आणि घुंगरू हे तिने तिचे वाद्य म्हणून वापरले. अनेकदा तबल्यासोबत साथ-सांगत म्हणून पदन्यास किंवा तत्कार केले जातात पण घुंगरुच वाद्य म्हणून वापरण्याची अदितीची ही संकल्पना खरोखरच उल्लेखनीय आहे.
हि संकल्पना अदितीला तिच्याच कामातून सुचली होती. तिने भारतात तिच्या कार्यक्रमांतून पदन्यास व तत्त्कारमधून अनेक फ्युजन प्रयोग केले होते. त्यामुळे हे काम पुढे गेले पाहिजे या उद्देशाने तिने या फेलोशिपसाठी अर्ज केला होता व तिथे तिला असे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी अक्षरशः अनेक पटींनी वाव मिळाला होता.
अदितीच्या आईने तिला अगदी चौथ्या वर्षीच नृत्य शिकायला पाठवले. जयपूर घराण्यातील पद्मश्री रोषन कुमारीजी यांच्याकडे तिने प्रशिक्षण घेतले. अदितीने चौदाव्या वर्षीच पहिला कार्यक्रम दिला होता. कथ्थकमधूनच तिने गांधर्व महाविद्यालयातून एम.ए. पूर्ण केले. शैक्षणिक विषयात तिने सायकोलोजी विषय घेऊन एम.ए. केले आहे. लयकारी व तालाचे शिक्षण घेतले. प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे या अदितीच्या ओडिसी नृत्याच्या गुरु आहेत. २००३ मध्ये आकृती या चमुसोबत पहिल्यांदा तिने जॅझ लावणी आणि जॅझ कथ्थकचे कार्क्रम केले. त्यानंतर अनेक दिग्गजांबरोबर कार्यक्रम करण्याचे तिचे पर्व सुरु झाले. त्यानंतर तिने परदेशी हि अनेक कार्यक्रम केले. सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला तो राजभावनमध्ये. त्यासोबतच तिने मालिका, चित्रपट व सुत्रसंचालनही केले. एका पेक्षा एक या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची ती परीक्षक होती. गेल्याच वर्षी तिने ‘म्योहो’ नावाचा एक प्रायोगिक चित्रपटही केला आहे व त्यात तिने नृत्यांगानेचीच भूमिका केली आहे व स्वतःचे नृत्य स्वतःच दिग्दर्शित केले आहे. मधुर भांडारकरच्या ट्राफिक सिग्नल या सिनेमातील तिने केलेलले आयटम सॉंगमुळे तिला कारकिर्दीतील धडा मिळाला होता. अदिती सांगत होती, “मला ते काम थोडं आव्हानात्मक वाटल होतं पण माझ्या गुरूंना ते आवडलं नाही. त्या मला म्हणाल्या की तू इतर आयटम सॉंग सदर करणाऱ्या मुलींना कथ्थक नृत्याबद्दल टाळ्या घेताना पाहिलं आहेस का? मग तुझ्याकडे जे आहे ते गमवायचे का? तुझी प्रतिमा सांभाळणे हे तुझ्या हातात असते. मलाही ते मनोमन पटले मग मी तो मार्गाच बंद केला. मी अभिनेत्री होण्यासाठी नृत्य शिकले नव्हते तर त्यातून मला अभिनयासाठी काम मिळत होते. मी अनेकदा कार्याक्रम आहेत म्हणून अनेक चित्रपटांना नाही म्हणाले. मला त्याचे फार दुःख वाटले नाही. कारण खरंच एक कथ्थक नृत्यांगना म्हणून मला जो आदर मिळत होता तो जास्त प्रिय वाटला.”
अदिती आज भारतात व परदेशात अनेक ठिकाणी शिबिर आयोजित करते. स्वतःचे विद्यार्थीही ती मोजकेच निवडते. प्रत्येक ठिकाणी ती प्रशिक्षणासाठी स्वतः हजर असते. स्वतःच्या नावाखाली क्लास किंवा शिबीर चालवणं आणि स्वतःच तिथे हजर न राहणं हे तिला पटत नाही. “शिकवणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे” असं ती म्हणते. तिला देशातील व परदेशातील विद्यार्थ्याबद्दल विचारले तर ती म्हणते, “नृत्याबाद्दलाचे प्रेम कुठेही कमी नसते. पण संकल्पना फार समजावून सांगाव्या लागतात. (मिश्किलपणे) आजच्या मुलांना इथेही सर्वच समजवावं लागते तरीही..... परदेशातील विद्यार्थ्यांना राधा आणि कृष्णाची छेडछाड सांगावी लागते, फुल आणि भुंग्याचे नाते भारतीय संदर्भात वेगळे आहे ते परदेशात फारच यांत्रिकपणे घेतले जाते. पण आपल्या संगीताला, नृत्याला परदेशात फार पसंत केले जाते, तिकडे याबद्दल फार आदर आहे.” यालाच जोडून अदितीने एक गमतीशीर गोष्ट सांगितली. अदितीला वन बीटचा परिवार ‘टकटक’ म्हणत. तिने तिकडे एखादा तराना सादर केला तर ते सारे अचंबित होत असत. ते म्हणायचे की तुम्ही इतक्या साऱ्या हरकती लक्षात कशा ठेवता.
तरीही कलेच्याबाबतीत भारतीय विचारसरणीबद्दल तिने थोडी खंत बोलून दाखवली. “भारतात इतकी समृद्ध कला आहे की वानाबीटसारखी फेलोशिप फक्त भारतातही यशस्वी होऊ शकते. पण अनेकदा चौकटीपलीकडे विचार केला जात नाही. शास्त्रशुद्ध पारंपारिक नृत्य सादर करण्यासाठी चौकटच योग्य आहे पण नवनवे प्रयोग करताना त्या रूढी मोडल्या पाहिजेत तेव्हाच तो नवा प्रयोग होतो. भारतात हे विचार उघडत नाहीत. तो बदल हळूहळू घडेल अजून वेळ लागेल. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. आपल्याकडे निदान शहरांमध्ये बॉलीवूडचा इतका मोठा पगडा आहे की तेच फार चांगले असते असं प्रत्येकाला वाटते. पण त्यापलीकडेही जग आहे, असू शकत किंवा ते कोणीतरी निर्माण केले पाहिजे याचा विचार केला जावा. परदेशात नियम बघितले जात नाहित त्यातील नाविन्यता बघितली जाते. तिकडे दृष्टीकोन महत्वाचा असतो. त्यातून मिळणारा अनुभव महत्त्वाचा असतो. आणि मग त्यावरती त्यांना अनुदान मिळते, योग्य ते मानधन मिळते. शेवटी कलाकारालाहि त्या साऱ्याची आवश्याकता असते.”
अदिती तिच्या कलेचा वापर तिच्या समाजाप्रती करण्याचा नेहमी प्रयत्न करते. तिने अनेक शाळांमध्ये  अनाथ आश्रम, महिलाश्रम येथे जाऊन काही शिबीर घेतलेली आहेत. त्यांना लेक्चर दिलेले आहेत. ती स्वतःचे आवर्तन नावाचे एक प्रोडक्शनही सांभाळते. त्याशिवाय तिला स्वयंपाक करायला आवडतो, ती चांगली चित्र काढते. पोहणे तिला आवडते, वाचायला आवडते. तिला सायकलिंग करायला आवडते. हि आवड मात्र ती परदेशी गेल्यावरच भगवते. तिला वेगवेगळ्या संकृतींची आवड आहे.... सध्या ती पेटी वाजवायला व गाणं शिकते आहे. ती जर्मन भाषा शिकली आहे. पर्शियन भाषा ती शिकत आहे. नुकताच तिने शिवावर संशोधन केले होते. अगदी शाळेपासून वेगवेगळे स्टॅंप्स गोळा करण्याची तीला आवड आहे.
कथ्थकसाठी तिला खूप उर्जा आवश्यक असते. त्यासाठी ती कमीतकमी २ तास व जास्तीत जास्त सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सराव करत असते. आहारातही समतोल आहार घेते. भरपूर भाज्या, फळं, तूप, मांसाहार, अंडी, नारळ पाणी, लिंबू असे पदार्थ ती कायम आपल्या आहारात घेते. त्यामुळेच ती स्वतःला उत्साही ठेऊ शकते असे ती म्हणते.
“कला हि आजकाल केवळ शिकण्यासाठी शिकली जाते किंवा कोणत्या तरी रिअलिटी शोमध्ये सहभाग घेण्यासाठी शिकली जाते. पण कला जोपासण्यासाठी शिकण्याचा दृष्टीकोन कमी होतोय. कोणतीही कला जोपासण्यासाठी शिकावी. त्याच्याबद्दल आदर असावा. आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात कलेविषयी किती इतिहास आढळतो...? शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश झालं पाहिजे. उद्या कोणी फार यशस्वी कलाकार होईलच असे नाही पण एखाद्या कलाकाराला मनापासून दाद तर देता येईल.” कलेबद्दलची अदितीची आत्मीयता तिच्या या विधानातून पुन्हा एकदा झणकारली.       

अदितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी:
http://www.youtube.com/watch?v=QdY23Frjjkc





No comments:

Post a Comment